भविष्यात ‘कोरोना’पेक्षाही घातक विषाणूची साथ येणार, इबोला शोधणाऱ्या शास्त्रज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जगात आणखी असे भयंकर विषाणू आहेत. ज्यांचा संगर्ग कोरोना विषाणूपेक्षाही भयानक असणार आहे. त्या विषाणूंच्या साथी आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय वनक्षेत्रातून सुरू होऊन साऱ्या जगभर पसरण्याची शक्यता असल्याचा धोकादायक इशारा इबोला विषाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ प्रा. जीन-जेकस मुयेम्बे टॅम्फम (Scientists prof Jean-Jacques Muembe Tampham ) यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात चिंता वाढली आहे.

टॅम्फम यांनी 1976 साली इबोला विषाणूचा शोध लावला होता. प्रा. टॅम्फम यांनी म्हटले आहे की, आपण अशा जगात राहात आहोत जिथे अनेक जीवघेण्या विषाणूंचे अस्तित्व आहे. इबोला विषाणूचा शोध लावल्यानंतर तशाच प्रकारचे घातक विषाणू शोधण्याच्या कार्याला टॅम्फम यांनी वाहून घेतले आहे. त्यांनी इबोलाबाबत केलेले संशोधन मानवजातीसाठी विलक्षण उपकारक ठरले. दरम्यान ब्रिटनमध्ये नुकताच कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने जगभर पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमान सेवेला बंदी घातली आहे. त्यात टॅम्फम यांनी आणखी भयानक विषाणूची साथ येण्याचा इशारा दिल्याने चिंतेत भर पडली आहे.