‘गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पिण्याचं पाणी आपल्यापर्यंत नेमक्या कोणत्या माध्यमातून पोहोचतं? ते पाईपलाईनच्या माध्यमातून पोहोचतं का? ती पाईपलाईन योग्य स्थितीत आहे? हे आपण कधीच जाणून घेत नाही किंवा आपल्याला तसे प्रश्न ही पडत नाही. मुळात, आपण याचा जास्त विचार करत नाही. मात्र, आपल्या घरात, ऑफिसमध्ये येणारं पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून येत असेल तर वेळीच सावध व्हा. आता पाण्याच्या पाईपांसंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील रिव्हरसाइड येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये पिण्याचे पाणी आणि गंजलेल्या पाईपांसंदर्भात झालेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.

नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, पाण्यात टाकायच्या औषधांमधील घटक आणि गंज लागलेल्या पाईपामधील रासायनिक प्रक्रियेनंतर तयार झालेल्या घटकांना “कार्सियोजेनिक हेक्साव्हेलेंट क्रोमिएम” असं म्हणतात. क्रोमिएम हा धातू नैसर्गिकपणे माती आणि जमीनीखालील पाण्यामध्ये काही प्रमाणात असतो. क्रोमिएममुळे लोखंड लवकर गंज पकडत नाही. मात्र काही रासायनिक प्रक्रियांमध्ये क्रोमिएमच्या मूल घटकांमध्ये बदल होतो आणि त्याचे रुपांतर हेक्साव्हेलेंटमध्ये होतं. या हेक्साव्हेलेंटमुळे जणुकांवर परिणाम होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. अशात हे संशोधन समोर आल्यानं चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यामध्ये हे घातक घटक निर्माण होऊ नयेत म्हणून क्रोमियमसोबत रासायनिक प्रक्रिया न करणाऱ्या रसायनांचा समावेश असणारी औषधं पाणी शुद्धीकरणासाठी वापरायला हवीत. पाण्याचे पाईप गंजलेले असतील तर आरोग्याला गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. पाईपमधील लोखंडाचा गंज आणि पिण्याच्या पाण्यामधील अशुद्धता घालवण्यासाठी वापरण्यात आलेले निर्जंतुकीकरणाच्या औषधांमधील काही घटकांची रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण करणारे घटक पाण्याच्या माध्यमातून माणसांच्या शरीरात प्रवेश करतात.

मार्लेन अ‍ॅण्ड रोजमेरी बोर्न्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये पाण्याचे रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारे प्राध्यापक आणि रसायनशास्त्रज्ञ हायजोऊ लुई यांनी यासंदर्भातील संशोधन केलं आहे. या अभ्यासामध्ये संशोधकांनी पाच ते सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या पाईप्सचे सॅम्पल्स घेतले होते. या संशोधनासाठी पाईपांवरील गंज काढून त्याची पावडर करण्यात आली. त्यानंतर या पावडरमध्ये क्रोमियमचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यात आली. याचे सॅम्पल्स हायपोक्लोरस अ‍ॅसिडमध्ये टाकण्यात आले. पिण्याचे पाणी ज्या प्रकल्पांमधून येते तिथे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी हायपोक्लोरस अ‍ॅसिड प्रकारातील क्लोरिन वापरले जात असल्याने या अ‍ॅसिडची निवड करण्यात आली.