Coronavirus : मनुष्याच्या शरीरामध्ये ‘कोरोना’ व्हायरस कुठं करतं ‘हल्ला’ आणि कशामुळं होतो मृत्यू, वैज्ञानिकांनी शोधून काढलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणू अल्पावधीतच जगासमोर गंभीर संकट म्हणून उदयास आला आहे. आज या साथीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकून पडले आहे. आतापर्यंत जगभरात 42 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र (सीएसएसई) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4,246,741 लोकांना या आजाराची लागण झाली आहे आणि 290,879 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्राणघातक विषाणूचा एक अहवाल समोर आला आहे. हा विषाणू लोकांना कसा मारत आहे हे त्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अहवालानुसार कोरोना विषाणू रोगप्रतिकारक यंत्रणेवर थेट हल्ला करतो, जे की संक्रमणाशी लढण्याचे कार्य करते.

प्रतिरोधक क्षमता अतिसक्रिय होते त्याला ‘सायटोकाइन स्टॉर्म’ म्हणतात

फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी चरण-दर-चरण समजावून सांगितले की विषाणू श्वसनमार्गाला कसा संक्रमित करतो, पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचे प्रमाण अतिसक्रिय करतो ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘सायटोकाइन स्टॉर्म’ म्हणतात. ‘सायटोकाइन स्टॉर्म’ ही पांढर्‍या रक्त पेशींच्या हायपरएक्टिव्हिटीची स्थिती आहे. या अवस्थेत रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात सायटोकाइन तयार होतात. या अभ्यासाचे लेखक आणि चीनच्या ज्युनी मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर दाइशुन लियू म्हणाले, सार्स आणि मर्ससारख्या संक्रमणानंतरही असेच घडते.

‘सायटोकाईन स्टॉर्म’ शरीरात ताप आणि रक्ताच्या जमावामुळे होतो

आकडेवारी असे दर्शविते की कोविड -19 मध्ये गंभीररित्या संक्रमित झालेल्या रुग्णांना ‘सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम’ असू शकतो. लियू म्हणाले, ‘अत्यंत वेगाने वाढणारी सायटोकाइन अत्यधिक प्रमाणात लिम्फोसाइट आणि न्युट्रोफिल सारख्या प्रतिरक्षा पेशींना आकर्षित करतात ज्यामुळे या पेशी फुफ्फुसांच्या ऊतींमध्ये प्रवेश करतात आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ लागते.’ संशोधकांचे म्हणणे आहे की ‘सायटोकाईन स्टॉर्म’ शरीरात ताप आणि रक्ताच्या जमावामुळे होतो. ते म्हणाले की, पांढऱ्या रक्त पेशी देखील निरोगी ऊतींवर हल्ला करतात आणि फुफ्फुस, हृदय, यकृत, आतडे, मूत्रपिंड आणि जननेंद्रियावर विपरित परिणाम करतात त्यामुळे ते कार्य करणे थांबवतात.

फुफ्फुसे काम करणे थांबवू शकतात

ते म्हणाले की बर्‍याच अवयवांचे कार्य थांबल्यामुळे फुफ्फुसे कार्य करणे थांबवू शकतात. या अवस्थेस ‘अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ म्हणतात. संशोधकांनी सांगितले की कोरोना विषाणूमुळे होणारे बहुतेक मृत्यू श्वसन प्रणालीच्या समस्येमुळे होतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातही खूप वेगाने पसरत आहे आणि आता 50 हजाराहून अधिक संक्रमित रुग्णसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत भारत 12 व्या स्थानावर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 32 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत 74,281 लोक प्रभावित झाले आहेत आणि 2415 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 24,386 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसरीकडे ईशान्य भारताबद्दल बघितले तर आतापर्यंत अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरममध्ये एक, मणिपूरमध्ये दोन, मेघालयात 13, आसाममध्ये 65 आणि त्रिपुरामध्ये 154 प्रकरणे समोर आले आहेत.