काय सांगता ! होय, आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, जाणून घ्या ‘रॅपिड टेस्ट’ टेकनिक

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत ३ कोटी ६ लाख ९७ हजार ७३४ जणांना याची बाधा झाली आहे. तर ९ लाख ५६ हजार ४४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात कोरोनाला रोखण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहेत. त्यातच संशोधकांनी नवीन रॅपिड टेस्ट विकसित केली आहे. कमीत कमी उपकरणांसह ही टेस्ट केली जाते. तसेच अगदी तासाभरात याचा अहवाल प्राप्त होतो.

अमेरिकेतील मसाच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे संशोधक याबाबत म्हणाले, स्टॉप कोविड नावाची ही टेस्ट असून लोकांसाठी किफायतशीर बनवली जात आहे. ज्या माध्यमातून लोक रोज स्वतःच स्वतःची चाचणी करु शकतील. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, नव्या टेस्टचा रिझल्ट ९३ टक्के एवढा आहे. तब्बल ४०२ रुग्णांच्या स्वॅब नमुन्यावर याचा प्रयोग करण्यात आला. सध्या संशोधक लाळेच्या सहाय्याने स्टॉप कोविडचे परीक्षण करत आहेत. या पद्धतीने घरच्या घरी टेस्ट करणे सोपे होईल.

संशोधकांनी सांगितले की, ‘रोजच्या रोज लोक स्वतःची टेस्ट करता यावी म्हणून, या घडीस टेस्टिंगची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल.’ हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधकांनी आशा व्यक्त केली आहे, की क्लिनिकल, फार्मसी, नर्सिंग होम आणि शाळांना डोळ्यासमोर ठेवून या टेस्टला अधिक विकसित केले जाऊ शकते. एमआयटी संशोधक जुलिया जोंग यांनी म्हटलं, ‘आम्ही स्टॉप कोविड टेस्ट विकसित केली आहे. ही टेस्ट लॅब शिवाय सामान्य माणूस सुद्धा करु शकतो.’

या माध्यमातून ९३ टक्के संसर्गित रुग्णांची ओळख पटली आहे. पारंपरिक पद्धतीच्या तपासणीचा दरही हाच आहे. या पद्धतीचे ट्रायल करताना संशोधकांनी ४०२ रुग्णांच्या नमुन्यांचे परीक्षण केले. त्यामध्ये ९३ टक्के रुग्णांची ओळख पटली.