‘स्काॅर्पिओ’ पलटी होऊन बलिकेचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – रस्त्यावर जिसेबीच्या सहाय्याने खोदलेल्या खड्यात आदळून ‘स्काॅर्पिओ’ मोटारीची पलटी झाली. या अपघातात जागीच चार वर्षाच्या बलिकेचा मृत्यू झाला तर नात्यातील नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी रस्त्याचे काम मिळालेल्या कंपनी व कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाषाण तलावासमोर, सुतारवाडी येथे झाला.

श्रद्धा उदय चव्हाण (४, रा. वडगाव, पुणे) या बलिकेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर मोटारीतील उदय चव्हाण (४०), नम्रता चव्हाण (३५), स्वराली चव्हाण (७, तिघे रा. वडगाव बु!, तळेगाव दाभाडे), सोनाली काळे (३१, रा. शिरूर), विनोद काळे (३१, शिरूर), वेदांत काळे (४, रा. शिरूर), खंडू बबन सपाटे (२०, रा. धानोरी, पुणे), प्रमोद पवार (२७, रा. वडगाव), पूजा पवार (२५, रा.वडगाव) हे सगळे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि सर्व जखमी शनिवारी रात्री स्कार्पिओ’ मोटारीतून निघाले होते. सुतारवाडी येथे रस्त्यावर खड्डा खोदून ठेवला आहे. मात्र त्या ठिकाणी याबाबत कोणताच फलक लावण्यात आला नव्हता.त्यामुळे ‘स्काॅर्पिओ’ खड्यात आपटून पलटी झाली. यामध्ये श्रद्धा हिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर गंभीर जखमी झाले आहेत. कामात हलगर्जीपणा, सुरक्षेतेच्या दृष्टीने साधन सामग्री न पुरवल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे पोलिसांनी त्रिवेणी मुद्राइ प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.