Video : खळबळजनक ! उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर स्कॉर्पिओ कार, आढळल्या जिलेटीनच्या कांड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया बंगल्यासमोर एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार आढळली आहे. कारमध्ये जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (दि. 25) सायंकाळी 6 वाजता हा प्रकार आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, फॉरेन्सिक टीम, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अंबानी यांच्या घरासमोर संशयास्पदरित्या आढळलेल्या या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीन हे स्फोटक, धमकीचे पत्र आणि 4 गाडीच्या नंबर प्लेट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. धमकीच्या पत्रात अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत मजकूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्कॉर्पिओ कारवर लावलेली नंबरप्लेट देखील बोगस आहे. यापूर्वी देखील उद्योगपती अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, आज त्यांच्या बंगल्याबाहेर आढळलेल्या संशयित कारमुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.