‘ती’ स्कॉर्पिओ 20 तास होती तेथे उभी; जिलेटीन कांड्या असलेली ती स्कॉर्पिओ ठाण्याहून आल्याने मुंबईसह ठाण्यात अलर्ट

मुंबई : मुुंबईच्या पेडर रोडवरील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळून आलेली स्कॉर्पिओ ती तब्बल २० तास त्या ठिकाणी उभी असल्याचे सीसीटीव्हीमधून आढळून आले आहे. ही गाडी ठाण्यातून आल्याने मुंबईसह ठाण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या गाडीत पोलिसांना धमकीचे पत्र आढळून आले आहे. या गाडीत १० नंबरप्लेट आढळून आल्या असून या नंबरप्लेट ज्या गाड्यांचे आहेत, त्या गाड्यांचा शोध आरटीओच्या मदतीने घेण्यात येत आहे. या गाडीत धमकीचे पत्र मिळाले असून त्यात त्यांनी हा तर केवळ ट्रेलर आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या घटनेची देशभरात गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ३ पोलीस उपायुक्तांची टीम तपासासाठी नेमण्यात आली आहे.

ही स्कॉर्पिओ बुधवारी मध्यरात्री एक वाजता कारमायकेल रोड परिसरात पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसर्‍या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे दुसर्‍या गाडीचा नंबर सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसला नाही. पोलिसांनी शहरातील गेल्या दोन दिवसातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. गाडीत सापडलेल्या सर्व नंबरप्लेटच्या गाड्यांचा शोध सुरु आहे. या स्कॉर्पिओची नंबरप्लेट बनावट आहे. सीसीटीव्हींमार्फत शोध सुरु असताना ही स्कॉर्पिओ ठाण्यातून आल्याचे स्पष्ट झाले असून आता ठाण्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या स्कॉर्पिओमधील २० जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला असता तर परिसरातील २० ते २५ मीटरचा भाग उद्धवस्त झाला असता, असे बॉम्बशोधक व नाशक पथकाचे म्हणणे आहे.

ही स्कॉर्पिओ पार्क करुन तिच्या चालकाला घेऊन जाणारी दुसरी कार कोणती ? तसेच त्या कारमध्येही स्फोटके आहेत का असतील तर ती कोठे आहे़ ? त्याचबरोबर या गाडीत सापडलेल्या नंबरप्लेटच्या गाड्या कोणाच्या आहेत़? त्या गाड्या सध्या कोठे आहेत? याचा तपास करण्यात येत आहे.