भंगारमधील वायर जाळण्यास मज्जाव केल्याने जीवघेणा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणाने भंगार व्यावसायिकाला वायर जाळू नको असं म्हटल्याच्या रागातून लाथा बुक्क्या आणि लोखंडी रॉडने ३ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

गौरव श्रीनिवास खांदवे (२७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहंम्मद मुस्तकिम दिन बहाद्दूर चौधरी (वय २२, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अभिरुल हसन खान हा पसार झाला आहे. याप्रकरणी श्रीनिवास खांदवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास खांदवे यांचा मुलगा गौरव खांदवे गुरुवारी रात्री जेवणानंतर फेरफेटका मारण्यासाठी गेला होता. घराजवळील काही अंतरावर भंगारचे साहित्य ठेवलेले असते. त्यावेळी भंगारमधील वायर जाळत तिघेजण तेथे बसले होते. वायर जळत असल्यामुळे धुराचा त्रास होत होता. त्यामुळे गौरवने त्याने आगीजवळ थांबलेल्या मोहम्मद व अमिरुल याला आग विझविण्यास सांगितले. यावरून त्या दोघांनी मिळून गौरवला लोखंडी रोडने तोंडावर मारून गंभीर जखमी केले तसेच त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विमानतळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक खोकले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.