Coronavirus Impact : पुणे रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या हायवेवर ‘स्क्रिनिंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून पुण्यामध्ये या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज संध्याकाळपासून पुणे रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुना हायवेवर स्क्रिनिंग केलं जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली. आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.

उद्यापासून विमानतळावर उतरणाऱ्या सगळ्या प्रवाशांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 65 वर्षावरच्या नागरिकांनी सतर्क राहवं असेही त्यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणजे भाजीपाला, डाळी, धान्य, दूध यांची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सेतू कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यात रजिस्ट्रेशन्सही बंद करण्यात आली आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी मिळून एकूण 19 कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत. शहरातील 1 लाख 74 हजार 235 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना 100 टक्के वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कालच सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र एका दिवसात हे पाळलं जाईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पुढच्या दोन दिवसांत हे पूर्णपणे अंमलात आणलं जाईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.