सी लिंकचे साहित्य चोरणार्‍या टोळीकडून 15 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवडी न्हावाशेवा सी लिंकच्या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणारे महागडे अल्युमिनियम व कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी विनोद गौतम, रमेश यादव, भगवानदास कोरी, सचिन टेंभुर्णे, अब्दुल खान, मोहम्मद खान, आसिफ चौधरी, मैनुद्दीन खान, नेपाळी खान (सर्व राहणार नवी मुंबई परिसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पनवेल व उरण भागात शिवडी न्हावाशेवा सी लिंक, रेल्वे पूल या सरकारी कामांच्या ठिकाणावरुन साहित्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. सी लिंक चे बांधकाम दर्जेदार होण्यासाठी लोखंड ऐवजी अल्युमिनिअमच्या सळई वापरण्यात येत असत. हे महागडे अल्युमिनियम, कॉपर केबल, सेंटरिंग प्लेट असे साहित्य चिर्ले येथील गोडाऊनमध्ये साठवण्यात आलेले. त्याठिकाणी पाळत ठेवून मागच्या बाजूने दलदलीच्या भागातून जाऊन हे साहित्य चोरी करायचे. त्यानंतर चोरलेले साहित्य विक्री करायचे.

याप्रकरणात गुन्हा नोंद होताच गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने तपासाला सुरुवात केली होती. त्याचवेळी पोलीस नाईक किरण राऊत व पोलीस शिपाई मेघनाथ पाटील यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या ९ जणांच्या टोळीस अटक केली. तसेच त्यांनी याआधी सुद्धा महामार्गाच्या कामाचे, रेल्वे पुलाचे साहित्य चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हांची उकल झाली असून, त्यांच्याकडून १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.