शाहरुख खानच्या बंगल्यासमोर इमारतीला भीषण आग, तरुणीचा होरपळून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या समोर एका इमारतीला आग लागून 22 वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. वांद्राच्या बँडस्टँड परिसरात सी स्प्रिंग या इमारतीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते.
ईव्हाना मॉरिस असे मृत्यू तरुणीचे नाव आहे तर सिफ्रा जाफरी असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सिफ्रा 90 टक्के भाजली असून त्यांना भाभा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आग लागलेल्या इमारतीचे नाव सी स्प्रिंग असून ही इमारत शाहरुख खानच्या मन्नत या घरासमोर आहे. आगीमध्ये 2 महिला भाजल्या असून यातील एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रहिवासी इमारत असल्यामुळे 6 व्या मजल्यावर कोणीतरी अडल्याची भीती होती. आग विझवल्यानंतर अग्निशमक दलाने दोन्ही महिलांना बाहेर काढले. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आग नेमकी का लागली याचा तपास पोलिस करीत आहेत.