Maharashtra News : काय सांगता ! होय, कुत्रीपासून पिल्लांची ताटातूट, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; सुरू झाली पिल्लांची शोधाशोध

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  सार्वजनिक रस्त्यावर भटकणाऱ्या एक कुत्रीसह तिच्या 6 पिल्लांची ताटातूट करणाऱ्या इसमाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतर्क नागरिकाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्याने उल्हासनगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

विठ्ठल ठाकरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राज चोटवानी या सतर्क नागरिकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नं-4 गुरुनानक शाळा परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर एक कुत्री तिच्या 6 पिल्लासह राहत होती. शनिवारी सायंकाळी साडे 5 वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल ठाकरे नावाच्या इसमाने कुत्र्याचे पिल्ले पकडली. पकडलेली कुत्र्याची 6 पिल्ले कॅम्प नं-5 येथील मासे मार्केट परिसरात सोडून दिली. कुत्री आणि पिल्लांची ताटातूट झाल्याने, सतर्क नागरिक राज चोटवानी यांनी याबाबतची तक्रार पोलीसात दिली. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणे अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच कुत्रीच्या पिल्लांची शोध मोहीम सतर्क नागरिक व पोलिसांनी सुरु केली आहे.