… म्हणून मुंबईतील SEBI चं मुख्यालय बंद !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळामध्ये (SEBI) एक कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सेबीचे मुख्यालय १० मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेबीमध्ये मॅनेजर पदावरती असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाला आहे. मिळालेल्या बातमीनुसार, सेबीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये न येता घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कोरोना संसर्गित मॅनेजरच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

याबाबत सेबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, गुरुवारी संध्याकाळी एका सहाय्यक जनरल मॅनेजरचा कोरोना संसर्ग चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने आम्ही सेबी भवन (मुख्यालय) आणि बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) येथील आयडीबीआय इमारत सॅनिटाइझ च्या उद्देशान बंद करण्यात आली. तरी आमची कार्यालये ११ मे पासून पुन्हा सुरु होतील, असं देखील या अधिकाऱ्याने म्हटलं.

लॉकडाऊन मध्ये सेबीने स्टॉक मार्केट ट्रेडिंग घरून सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी गुरुवारी शेअर बाजार नियामक असणाऱ्या सेबीने फ्रँकलिन टेंपलटन म्युच्यूअल फंडाला निर्देश दिलेले होते की, त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे, ज्यांनी त्यांच्या सहा डेट या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. या योजनेत गुंतवणूकदारांनी ३० कोटी रुपये गुंतवले आहे.