शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध दुसरा गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या विरुद्ध सांगलीत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत आरोपीकडून फसवणूकीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रकाश कल्लेशा पाटील (वय 38, रा. वसंतनगर, सांगली) याला गुरुवारी सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान ठकसेन पाटीलने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील अनेकांना शासकीय नोकरीच्या आमिषाने लाखो रूपयांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी  शहर पोलिसांनी त्याला ऑगस्टमध्ये अटक केली होती.
याप्रकरणी कविता विनोद दळवी (वय 37, मूळ रा. तुंग, सध्या रा. खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये दळवी यांची ठकसेन प्रकाश पाटील याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आपले नाव रमेश वाडकर असल्याचे सांगून सोलापूर येथे उपअधीक्षक असल्याचे सांगितले होते. ओळख वाढल्यानंतर त्याने कविता दळवी यांना लेखाधिकारीपदी नोकरी लावतो असे सांगितले. तो मोठा अधिकारी असल्याने काम करेल असे वाटल्याने कविता दळवी आणि त्यांची जाऊ कविता प्रमोद दळवी यांनी प्रत्येकी 55 हजार रूपये असे एक लाख दहा हजार रूपये त्याला दिले होते.
पैसे दिल्यानंतर नोकरीबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. नंतर दळवी यांना मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये आपण रमेश वाडकरचही बहीण असून रमेशचा जुनोनी येथे अपघात झाला आहे. त्यात तो मृत झाला आहे. त्याचा मृतदेह घेऊन मिरजेला येत आहे असा मजकूर होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी हातकणंगले पोलिसांनी त्याला अटक केल्याची बातमी दैनिक पुढारीमध्ये आली होती. त्यावरून त्याला ओळखल्याचे दळवी यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर दळवी यांनी 23 ऑगस्टला त्याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी कोल्हापूर येथील बिंदू चौक कारागृहातून त्याचा ताबा घेऊन त्याला अटक केली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. इंदलकर यांनी दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शकील पखाली यांनी काम पाहीले.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
दरम्यान, प्रकाश पाटील याने फसवणूक केलेल्या लोकांनी सांगली शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांनी केले आहे. शिवाय त्याच्याविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत आठ गुन्हे उघडकीस…
ठकसेन प्रकाश पाटील याला इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दि. 22 ऑगस्ट रोजी अटक केली होती. तर सांगली शहर पोलिसांनी दि. 28 ऑगस्ट रोजी अटक केली होती. आतापर्यंत त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने संजय भोसले, संजय जाधव, सुनील तारवार, प्रशांत मोरे, रमेश वाडकर, सुरेश जाधव अशी खोटी नावे धारण केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.