100 दिवसांनंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो ‘कोरोना’ : ICMR

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना विषाणुचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी 100 दिवस निश्चित करण्यात येणार आहे. म्हणजेच एखादा रुग्ण एकदा कोरोनातून बरा झाला तर 100 दिवसांनंतर पुन्हा त्याला संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे 3 रुग्ण आढळून आले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

याबाबत बोलताना बलराम भार्गव म्हणाले, “भारतात कोरोनाच्या पुनर्संसर्गासाठी 100 दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटीबॉडीजचं जीवनमान आहे. अशी पुनर्संसर्गाची भारतात 3 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे 2 डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसंच पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत.”

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, 45 ते 60 वयोगट असणाऱ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यूचं प्रमाण 35 टक्के आहे. आर्थिक घडामोडी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील रुग्णांच्या संसर्गांचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा तरुण वर्ग हा असा विचार करतो की, आपल्या कमी वयामुळं आपलं आरोग्य चांगलं आहे. त्यामुळं आपल्याला संसर्ग होणार नाही किंवा ते लवकर बरे होतील. मात्र लोकांमध्ये असा समज निर्माण होण्यापासून त्यांना रोखलं पाहिजे. भारतात कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट हा सातत्यानं कमी होत आहे. दरम्यान 87 टक्के लोक हे कोरोनातून बरे झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे.