दिलासादायक ! देशात दुसरी ‘कोरोना’ लस देखील ‘रेडी’, लवकरच होणार मानवी चाचणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनावरील लस विकसित करणार्‍या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी देशात करोनाची पहिली लस तयार करण्यात आली होती. यामहिन्यात लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, देशात दुसरी करोना लसही तयार करण्यात आली असून त्याच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी लस आहे जिच्या मानवी चाचणीसाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे.

दुसरी लस अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड तयार करत आहे. ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या लसीच्या फेज 1 आणि फेज 2 च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे.

याच आधारावर त्यांना पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंपनी लवकरच मानवी चाचणीसाठी एनरॉलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी कंपनीला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनंदेखील उशीर न करता त्वरित याच्या पुढील चाचणीला परवानगी दिली आहे.