दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : दुसऱ्या टप्प्यातील 1,454 कोटींचा निधी वितरित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे 1 हजार 454 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य शासनाने वितरित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी 2 हजार 909 कोटी 51 लाख 9 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता. उर्वरित 1 हजार 454 कोटी 75 लाख 54 हजार 680 एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही रक्कम तातडीने पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचावी, यासाठी मदत निधीचा दुसरा हप्ता तात्काळ वितरित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे 7.06 कोटी, नाशिक विभागाला 446.48 कोटी, पुणे विभागाला 206.59 कोटी, औरंगाबाद विभागास 525.29 कोटी, अमरावती विभागास 237.18 कोटी आणि नागपूर विभागास 32.13 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून 31 मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागास पहिल्या हप्त्याची 1 हजार 454 कोटी 75 लाख 54 हजार 680 एवढी रक्कम 29 जानेवारीला वितरित करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाने ही मदत जाहीर केली असल्याचं निंबाळकर यांनी सांगितले.