पिंपरी चिंचवडमधील ध्वजस्तंभावर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तरी ध्वज फडकणार का ?

पिंपरी चिंचवड : पोलिसनामा ऑनलाइन – देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच ध्वजस्तंभावर येत्या स्वातंत्र्यदिनाला ध्वज फडकण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पिंपरी चिंचवडमधील हा ध्वज फडकवण्यासाठी ठेकेदाराला काम दिले नसल्यामुळे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या १०७ मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर झेंडा कधी फडकवणार असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील उद्यानात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला हा ध्वज फडकाविण्यासाठी मान्यता मिळाली. गतवर्षी २६ जानेवारी २०१८ रोजी याचे उद्घाटन पालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून करण्यात आले होते.

या उंच ध्वजस्तंभामुळे शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना शहरवासियांमध्ये होती. हा ध्वज पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी येथे होत होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांत बोटावर मोजण्याइतकेच दिवस याठिकाणी ध्वज फडकल्याचे समोर येत आहे. साडेतीन महिन्यापूर्वी १ मे रोजी आणि त्यापूर्वी २६ जानेवारीला येथे ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र बऱ्याच वेळा ध्वजाचे कापड फाटल्यामुळे ध्वज काढावा लागला होता.

इतर शहरामध्ये जसे सार्वजनिक ध्वज आहेत त्याप्रमाणे ध्वज आपल्याही शहरात असावे म्हणून पालिकेने मोठा खर्च करून या ध्वजाची उभारणी केली मात्र कित्येक दिवस ध्वज नागरिकांना न दिसल्यामुळे शहरवासियांमध्ये मोठी निराशा आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी तरी येथे ध्वज फडकणार कि नाही याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त