…. तर दुसरी पत्नी पोटगीसाठी अपात्र, नागपूर खंडपीठाचा निकाल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्या पत्नीने पोटगीसाठी दिलेल्या अर्जावरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोट न देता अवैध लग्न करणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्वपपूर्ण निर्णय दिला आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठासमोर हि सुनावणी झाली.

नागपूर येथील स्नेहा व विकास (बदललेली नावे) यांनी १३ मे २००७ रोजी लग्न केले होते. विकासाचे हे दुसरे लग्न होते. परंतु त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्याचे पहिले लग्न कायम होते. त्यामुळे त्याचे स्नेहाबरोबरचे लग्न अवैध ठरले. स्नेहा व विकास लग्नानंतर काही दिवस आनंदात सोबत राहिले. मात्र त्यांच्यात हळूहळू वाद होऊ लागले. सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून ६ एप्रिल २००९ पासून दोघेही वेगळे झाले. दरम्यान स्नेहाने पोटगी मिळावी यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली.

मात्र कुटुंब न्यायालयाने २८ जानेवारी २०१६ रोजी स्नेहाचे विकास सोबतचे लग्न अवैध ठरवून पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेत कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत स्नेहाचे अपील फेटाळून लावले.