शरद पवार अन् अमित शहा यांच्यात गुप्त बैठक? चर्चांना उधाण

अहमदाबाद: पोलीसनामा ऑनलाईन – अंबानी स्फोटक प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन मृत्यू तसेच परमवीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आदी प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. मात्र असे असताना दुसरीकडे गुजरातमध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली आहे. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही भेट होताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का हे समजू शकले नाही. तसेच पवार, पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिले आहे.

अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर शुक्रवारी (दि. 26) रात्री पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली आहे. दरम्यान अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे अडचणीत आले. त्यावेळी भाजपने वाझे आणि शिवसेनेचे संबंध पुढे आणत मुख्यमंत्री ठाकरेंना लक्ष्य केले. यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री देशमुखांवर वसुलीचा आरोप केला. त्यानंतर देशमुख अडचणीत आले आणि शिवसेनेवर असलेला टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.