जम्मू मध्ये सेक्शन १४४ लागू ; ४ पेक्षा जास्त लोकांचा समूह बेकायदेशीर

जम्मू : वृत्तसंस्था – काश्मीर खोरे दहशतवादाच्या सावटाखाली असताना आता जम्मू शहराच्या जिल्हा दंडाधिकारी सुषमा चौहाण (IAS) यांनी जम्मू म्युनिसिपल क्षेत्रात सीआरपीसीचे सेक्शन १४४ लागू केले. जम्मू काश्मीर राज्य सध्या दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत सुनावल्यानंतर पाकिस्तान पलटवार करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजपर्यंत केवळ काश्मीर खोऱ्यामध्ये असलेल्या दहशतीचे सावट आता जम्मूतही पसरत असल्याचे दिसून येत आहे.

जम्मूच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सुषमा चौहाण यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जम्मू म्युनिसिपल क्षेत्रात सेक्शन १४४ लागू केला. जम्मू शहरात दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन जम्मूच्या जिल्हा दंडाधिकारी या नात्याने त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०१९, सोमवारी सकाळी ६ वाजेपासून हा आदेश लागू होईल. या आदेशानुसार ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्रितपणे जमाव करून कोणतीही कृती करण्यास मनाई केली जाते. त्यानुसार जम्मू म्युनिसिपल क्षेत्रात आता ४ पेक्षा जास्त लोकांनी जमाव एकत्र येऊन कृती करणे हा गुन्हा ठरणार आहे.

राज्यातील परिस्थिती बघता हि पूर्वकाळजी घेणे गरजेचे होते असे जिल्हा दंडाधिकारी सुषमा चौहाण यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यात नमूद आहे. पूर्वनिश्चित धार्मिक किंवा पारंपरिक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जो पर्यंत सेक्शन १४४ चा आदेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत सरकारी आणि खाजगी शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा आदेशही देण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अशा प्रकारची पूर्वतयारी असणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.