‘बाप्पा’ला निरोप ! प्रथमच शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त, मंडळे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जनासाठी यंदा प्रथमच मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे. सुमारे 3 हजार 189 पोलिसांचा बंदोबस्त पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला असून राज्य राखीव दल, होमगार्ड आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन यांनी दिली.

गुरुवारी (दि. 12) अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करण्यात येते. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 26 गणेश विसर्जन घाट आहेत. त्यापैकी पिंपरीतील सुभाषनगर घाट, चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिर, पवना नदीवरील थेरगाव पूल घाट, निगडीतील गणेश तलाव आदी ठिकाणी बहुतांशी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते.

विसर्जनासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवली असून शहरात पोलिसांची विशेष पथके तैनात असणार आहेत. एक हजार पेक्षा जास्त मंडळांचे दहाव्या दिवशी विसर्जन होते. विसर्जनासाठी पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपआयुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 55 पोलीस निरीक्षक, १६९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, एक हजार ९५३ पोलीस कर्मचारी आणि १ हजार होमगार्ड एवढा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचबरोबर ९० जवानांची राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी देखील या बंदोबस्तात तैनात आहे.

पोलीस मित्र, समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी असे सुमारे ७५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी मोबाईल व्हॅन गस्तीवर असणार आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके देखील तैनात केली आहेत. त्याद्वारे सोनसाखळी चोरटे, पाकीटमार, बॅग पळवणा-यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. महिलांची छेडछाड करणा-या भामट्यांवर देखील पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.