आता तुम्हाला पाहिजे तेच चॅनेल पाहता येतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या १ फेब्रुवारीपासून डिश व केबल टीव्ही ग्राहकांना अनेक नको असणारे चॅनेल वगळून केवळ आवडते चॅनेलच निवडून त्यासाठी पैसे मोजणे शक्य होणार आहे. जे चॅनेल बघितलेही जात नव्हते, ते चॅनेल प्रत्येक ग्राहकांना घ्यावे लागत होते. मात्र आता त्या संबंधातील नियमांमध्ये १ फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलांमुळे ग्राहकांना केवळ पॅकमध्ये दिलेल्या चॅनेलसाठी पैसे देण्यासाठी बाध्य करता येणार नाही.

चॅनेल वा वाहिन्या निवड प्रणालीसाठी उपग्रह व केबल टीव्ही चालकांना ३१ जानेवारीपर्यंत वेळ दिली आहे. यापूर्वी ट्रायने त्यांना २९ डिसेंबर २०१८ ही कालमर्यादा दिली होती. मात्र कंपन्या त्यामध्ये सफल झाल्या नाहीत. त्यामुळे आता ट्रायने १ फेब्रुवारी ही अखेरची तारीख दिली आहे. चॅनेल्सची किंमतही ट्रायने नक्की केली असून एका चॅनेलला जास्तीत जास्त १९ रुपये इतकी किंमत द्यावी लागणार आहे.

चॅनेल निवड प्रणालीद्वारे दर्शकांना एखाद्या चॅनेलच्या पॅकची किंमत देण्याऐवज निवड करून त्या निवडक चॅनेलसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. नको असलेल्या चॅनेलसाठीही पैसे भरण्याची त्याला गरज राहाणार नाही. त्यासाठी त्याला पर्याय असणार आहेत. पॅकची ऑफर कंपन्या देणार आहेत. मात्र ग्राहकांना त्या पॅकमध्ये असलेल्या चॅनेलसाठी बाध्य केले जाऊ शकणार नाही. किमान कागदावर तरी ग्राहकांकडे आता चॅनेल निवडण्याचा हक्क असला, तरी कंपन्या वा सेवा प्रदाता चॅनेल्सना एकत्रित करून ते ग्राहकांना देऊ करतात. सध्या प्रति चॅनेलची किंमत महिन्यासाठी ६० रुपये इतकी कमाल किंमत आहे. मात्र डिसेंबरमध्ये या सर्व प्रक्षेपकांना त्यांच्या चॅनेलची किंमत सादर करण्यास ट्रायने सांगितले व त्यानुसार त्यांनी जी किंमत ट्रायला कळवली ती विद्यमान किमतीपेक्षा ४-५ पट कमी आहे.