अभिमानास्पद ! महाराष्ट्राच्या ‘सीड मदर’चा अटकेपार झेंडा ; कान्समध्ये पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७२ वा कान्स चित्रपट महोत्सव मोठ्या दिमाखात सुरु आहे. या चित्रपट मोहोत्सवात अच्युतानंद द्विवेदी या भारतीय पठ्ठ्याने चमकदार कामगिरी केली आहे. नगर जिल्ह्यातल्या ‘बीज माता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई सोमा पोपरे यांच्यावर आधारित तयार केलेल्या ‘सीड मदर’ या लघुपटाला ‘नेप्रेसो टॅलेंटस्- 2019’ या विभागात तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीयांची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

वुई आर व्हॉट वुई इट विषयात पुरस्कार

७२ व्या कान्स चित्रपट महोत्सवात नेप्रेसो टँलेंट या विभागात यंदा ‘वुई आर व्हॉट वुई इट’ म्हणजेच ‘अन्नाच्या माध्यमातील अनुभवांची देवाणघेवाण’ हा विषय देण्यात आला होता. यात शेती व जैवविधता, अन्न वारसा आणि मूल्य साखळी, लोकप्रिय संस्कृतीतील अन्न असे तीन विषय देण्यात आले होते. याच विषयांना अनुसरून ‘सीड मदर’ हा लघुपट बनवण्यात आला होता. या लघुपटाचे निर्माते अच्युतानंद द्विवेदी हे मूळचे मुंबईचे आहेत. मात्र सध्या ते पद्दुचेरी येथे राहतात.

४७ देशांमधून ३७१ लघुपटांचा समावेश

दरम्यान, या स्पर्धेकरिता ४७ देशांमधून ३७१ लघुपटांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी नेप्रेसो विभागात पहिला पुरस्कार आंतरराष्ट्रीय गटात न्यूझीलंडच्या जोश मॉरिस यांना बालीमधील तांदूळ लागवडीवर आधारित सुबक या लघुपटासाठी मिळाला. तर दुसरा पुरस्कार हा मेक्सिकन निर्माते मार्को ऑरेलिओ सेलीस यांना रूफो या लघुपटासाठी मिळाला आहे. तिसरा क्रमांक ‘सीड मदर’ला मिळाला आहे.

‘सीड मदर’ मध्ये नक्की काय ?

नगर जिल्ह्यातील बीज माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई सोमा पोपरे यांची कहाणी ‘सीड मदर’ या लघुपटात दाखवण्यात आली आहे. राहीबाई यांनी कृषी क्षेत्रात घडवून आणलेले बदल, तयार केलेली बीजपेढी यांचे चित्रण द्विवेदी यांनी या लघुपटात केले आहे. त्यांच्या बीजपेढीतील बियाणे आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहेत. त्यांच्या कार्याची दाखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता त्यांच्यावरील लघुपटाला पुरस्कार देखील मिळाला आहे.