धक्कादायक ! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन –  दीड वर्षापूर्वीच लग्न झालेल्या पती-पत्नीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. नालासोपा-यातील पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमध्ये शुक्रवारी (दि. 20) रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पैशांच्या चणचणीमुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय तुळिंज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राहुल धना चव्हाण (28) आणि ज्योती राहुल चव्हाण (23, रा. एव्हरशाईन सीटी, सेक्टर 4) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सीटीमधील सेक्टर नंबर 4 मध्ये राहुल आणि ज्योती हे जोडपे राहत होते. त्यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. राहुल हा मेट्रोमध्ये गार्डची नोकरी करीत होता. दरमहा 18 हजार रुपये येणाऱ्या पगारात घरातील खर्च भागत नसल्याने पैशांवरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असल्याचे सूत्रांकडून कळते. या दोघांनी शुक्रवारी राहत्या घरात पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या मावशीला संध्याकाळी घरात विजेचा प्रकाश न दिसल्याने संशय आला. पती कामावरून आल्यावर घर आतून बंद असल्याने दरवाजा तोडल्यावर ही घटना उघडकीस आली. रात्री साडेअकराच्या सुमारास मावशीने तातडीने तुळिंज पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्यांचा अहवाल आल्यावर नक्की कारण कळेल, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी दिली आहे.