‘शिवसेनेनं बदललेले रंग पाहून सरडाही आत्महत्या करेल’, भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेनं बदललेले रंग पाहून सरडाही आत्महत्या करेल असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. रविवारी वसईत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. सीएए राज्यात लागू होऊ देणार नाही या शिवसेनेच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली.

वसईतील सभेत बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, “आज मी टीव्ही पाहताना दिसलं की शिवसेनेनं भूमिका बदलली आहे. शिवसेनेच्या भूमिकेचं जर वर्णन करायचं झालं तर शिवसेनेचे बदललेले रंग एवढे आहेत की, सरड्यानंसुद्धा आत्महत्या करावी. शिवसेनेनं बदललेले रंग पाहून सरडाही आत्महत्या करेल.”

पुढे बोलताना शेलार म्हणाले, “सीएए महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही ? हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का ?”अशा शब्दात आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर जहरी टीका केली. हा केंद्राचा कायदा आहे. जर याबाबत माहिती नसेल तर याचा अभ्यास करा. नसेल करता येत तर माझ्यासारखे खूप वकिल आहेत असंही शेलार म्हणाले.