‘अन्य आजारांवर उपचारास नकार दिल्यास कारवाई करा’, उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबईत देखील कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. मुंबईतील बऱ्याच रुग्णालयांमध्ये केवळ कोरुनाबाधित रुग्णांना भरती करून घेतले जात आहे. मात्र कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना देखील पुरेशी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे , तसेच उपचारासाठी नकार देणाऱ्या रुग्णालयावर थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक रुग्णालये केवळ कोरोनाबाधित रुग्णांनाच दाखल करून घेत आहेत व अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवसायाने वकील असलेले मतहर खान यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

रुग्णालयांच्या या भूमिकेमुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात धाव घेणाऱ्या रुग्णांची जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्याचे खान यांनी याचिकेत म्हटले आहे. अशा घटना टाळता याव्यात यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी, अशी विनंती खान यांनी केली आहे. कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनी त्रासलेल्या रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे वृत्त वाचल्यावर मी स्वत: अनेक रुग्णालयांत जाऊन याची खातरजमा करून घेतली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याचिकेत मांडण्यात आलेले महत्वाचे मुद्दे

–कोरोनाबाधित तसेच अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळावी.
— रुग्णवाहिका अपुऱ्या पडत असल्यास एसटी किंवा खासगी बसेसचा वापर रुग्णवाहिका म्हणून करण्यात यावा.

–वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील रुग्णालयांनी आपला दैनंदिन कारभार –थांबवल्याचे याचिकेत म्हटले आहे.
–बऱ्याचशा रुग्णालयांच्या ओपीडीही बंद आहेत.

— कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांनाही पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
— असे निर्देश राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला देण्यात यावेत, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.