ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना दुर्मिळ आजारानं ग्रासलं, प्रकृती खालावली !

पोलिसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव हे मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील गाजलेलं नाव आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. सीमा देव यांना एका दुर्लभ आजारानं ग्रासलं आहे. अल्झायमर या आजारानं त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

अजिंक्य देव आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “माझी आई श्रीमती सीमा देव अल्झायमरच्या आजारनं ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंब त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांनीही त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करावी.”

काय आहे अल्झायमर ?

अल्झायमर हा प्रामुख्यानं वार्धक्यात होणारा आजार आहे. सोप्या भाषेत स्मृतीभ्रंश किंवा विसरभोळेपणा असा याचा अर्थ होतो. या आजाराचा रुग्णावर विपरीत परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतीभ्रंश होतो. जवळच्या लोकांची नावं, जेवण आदी विसरण्यापर्यंत हा आजार बळावतो.

कोण आहेत सीमा देव ?

सीमा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठी सोबतच हिंदी सिनेमातही अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. जगाच्या पाठीवर या सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर घरखर्चाला हातभार म्हणून सीमा या बॅले आर्टीस्ट म्हणून काम करत होत्या. एकदा सुरेश फाळके त्यांचा बॅले शो बघायला गेले होते. याच ठिकाणी फाळके यांनी त्यांना सिनेमात काम करण्यासाठी विचारलं. सुवासुनी, आनंद अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 1 जुलै 1963 रोजी सीमा आणि रमेश देव विवाहबद्ध झाले होते.