‘या’ कारणामुळं 2030 पर्यंत भारतात मुलींच्या संख्येत होणार 68 लाखांची घट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात निवडक गर्भपात झाल्यामुळे 2030 पर्यंत मुलींच्या जन्माच्या संख्येत सुमारे 68 लाखांची घट होणार आहे आणि सर्वाधिक घट उत्तर प्रदेशात झालेली पहायला मिळणार आहे. सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ आणि फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी डी पॅरिसच्या संशोधकांनी एका अभ्यासानंतर ही गोष्ट सांगितली आहे.

1970 च्या दशकापासून भारतात आहे असमतोल

1970 च्या दशकापासून जन्मपूर्व लिंग निवड आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतातील मुलांना जास्त प्राधान्य दिल्याने जन्माच्या वेळी लैगिंक प्रमाणात असंतुलन निर्माण झाले आहे, असे या अभ्यासात नमूद केले आहे. संशोधकांनी असे म्हटले आहे की, अशा असंतुलनांमुळे प्रभावित इतर देशांप्रमाणे भारतात लैंगिक प्रमाणातील असंतुलन प्रादेशिक विविधतेनुसार बदलते.

उत्तर प्रदेशावर पडेल सर्वाधिक परिणाम

‘पीएलओएस वन’ या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात संशोधकांनी असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात मुलींच्या जन्मामध्ये सर्वाधिक घट होणार आहे. 2017 ते 2030 पर्यंत अंदाजे 20 लाख कमी मुलींचा जन्म होईल. अभ्यासात म्हटले आहे की, ‘2017 ते 2030 पर्यंत संपूर्ण भारतभरात 68 लाख कमी मुली जन्माला येतील.’

अशाप्रकारे असेल आकडा

संशोधकांनी असे म्हटले आहे की, 2017 ते 2025 दरम्यान दर वर्षी सरासरी 4,69,000 कमी मुली जन्माला येतील. त्याचबरोबर, 2026 ते 2030 दरम्यान ही संख्या दर वर्षी सुमारे 5,19,000 असेल. भारतात, 1994 मध्ये निवडक गर्भपात आणि जन्मपूर्व लैंगिक चाचणीवर बंदी घालण्यात आली होती.