स्वयंघोषित ‘डॉन’च्या ‘वराती’नंतर तक्रारींचा ‘पाऊस’ ! पोलिसांची ‘आयडिया’, साडेपाच कोटींची संपत्ती जप्त

नागपूर : पोलिसनामा ऑनलाइन – नागपूरमधील स्वयंघोषित डॉनच्या दहशतीमुळे त्याच्या विरोधात कोणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. लोकांना विश्वास वाटावा म्हणून पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात नेताना चक्क पायी वरात काढली. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या डॉनवर मोका कारवाई करुन त्याची साडेपाच कोटीची संपत्ती जप्त केली आहे.

संतोष आंबेकर असे या स्वयंघोषित डॉनचे नाव आहे. त्यांची नागपूरात दहशत असून त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. एका व्यापाऱ्याला धमकावून प्रथम पाच कोटी व त्यानंतर एक कोटी रुपये वसुल केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. गुजराथी व्यापारी असल्याने त्याने हे धाडस केले. पोलिसांच्या हाती आता तक्रार आल्याने त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करुन संतोष आंबेकर याला अटक केली.

पण, त्याच्याविरुद्ध स्थानिकांकडूनही तक्रारी येणे आवश्यक होते, तरच त्याच्यावर मोठी कारवाई करणे शक्य होते. तेव्हा पोलिसांनी एक शक्कल लढविली. त्याला न्यायालयात नेताना वाहनात बसवून न नेता चक्क पायी पायी हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत त्याला न्यायालयात आणले. हाप पँट वरील या गुंडाला बेड्यांमध्ये पाहिल्यावर लोकांना पोलिसाविषयी विश्वास वाटू लागला. त्यानंतर पोलिसांकडे अनेक व्यापाऱ्यांनी धमकावून खंडणी मागितल्याच्या तक्रारी दाखल केल्या. एका महिला डॉक्टराने धमकावून बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे.

आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई केली.
त्याच्या ५ महागड्या कार, ३ महागड्या बाईक्स यासह एकूण साडेपाच कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. नागरिकांनी निर्धास्तपणे कोणत्याही भितीशिवाय समोर येऊन संतोष आंबेकर याच्याविरोधात तक्रारी द्याव्यात. आम्ही कठोर कारवाई करु असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Visit : Policenama.com