धोका पत्करत क्रूझवर सेल्फी काढणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भारतातील पहिल्या आंग्रीया या मुंबई-गोवा अलिशान क्रूझच्या टोकावर धोकादायक पद्धतीने बसून सेल्फी काढल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. अमृता फडणवीस यांचा सेल्फी घेतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. जीव धोक्यात घालत सेल्फी घेणाऱ्या अमृता फडणवीस यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना राज्यात आजपर्यंत घडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रमुखाच्या पत्नीनेच जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रदर्शन पोलिसांसमक्ष केल्यास चूकीचा संदेश समाजात जाईल, अशी टीका नेटकऱ्यानी केली आहे. भाऊचा धक्का येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई-गोवा या जलप्रवासासाठी  सज्ज झालेल्या आंग्रीया क्रूझच्या पहिल्या प्रवासासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि काही स्थानिक आमदार देखील उपस्थित होते.

राज्यराखीव दलाच्या गाडीला अपघात; २० जवान जखमी

कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री व गडकरी यांच्यासोबत क्रूझचे संचालक, कॅप्टन हे समोर बसून सर्व चित्र पाहत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रूझवरील सर्वात वरच्या भागावर जाऊन टोकावर बसून सेल्फी काढला. त्यांच्या या सेल्फीने सोबत असलेल्या पोलीसही हादरले होते. अमृता फडणवीस यांच्या या सेल्फीची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.