ऐकावे ते नवलच ! बिबट्याच्या बछड्याला पकडून घेतला सेल्फी, व्हिडीओ व्हायरल

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ऐकावे ते नवलच गेल्या काही दिवसांपूर्वी मगरीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका गावकऱ्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता तसाच काहीसा प्रकार निफाडमधून समोर आलाय. जिवंत मगरीनंतर आता चक्क बिबट्याला हातात पकडून ऊसतोड कामगारानं बिबट्यासह सेल्फी घेतलाय. विशेष म्हणजे जीवाची पर्वा न करता त्यानं हे धाडस केल्यानं सगळीकडेच हा चर्चेचा विषय आहे.त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्यामुळे या उसाच्या मळ्यात बिबट्यांना राहायला चांगली जागा मिळते. तसेच उसाच्या मळ्यामध्ये राहायला आणि लपायला जागा मिळत असल्यानं त्यांची वाढही मोठ्या प्रमाणात होत आहे. बिबट्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना लपण्यासाठी उसाचे क्षेत्र हेच त्यांचे जंगल आहे. याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलानं न घाबरता या ४ ते ५ महिन्यांच्या बछड्याला उचलून घेतले सेल्फी काढला.

कुरुडगाव शिवारात सध्या ऊस तोडणी जोरात सुरू आहे. ऊस मजूर काम करत असतानाच त्यांना बिबट्याचे बछडे सापडले. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलानं न घाबरता या ४ ते ५ महिन्यांच्या बछड्याला उचलून घेतले. विशेष म्हणजे थेट जीवाची पर्वा न करता त्या मुलांनी बिबट्याच्या बछड्याबरोबर सेल्फी फोटो काढले.

सेल्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, निफाड मध्ये बिबट्यासह काढलेल्या सेल्फीची चर्चा आहे. दरम्यान बिबट्याची मादी जवळ असती आणि तिने हल्ला केला असता तर काय अनर्थ घडले असते, याचा विचार न केलेलाच बरा. अशा सेल्फी बहाद्दरांवर वनविभाग कारवाई करणार की फक्त कागदावरच नियमांचे घोडे नाचणार याकडे आता प्राणी मित्रांचे लक्ष लागून राहिले आहे.