‘अवलिया’ पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना निरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पारंपारीक पोलिस खात्याच्या कामाला बगल देत, सध्या आवश्यक असणारी पोलिसिंग पध्दत राबवत काम करणाऱ्या ‘अवलिया’ पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाली. त्यामुळे सोमवारी (दि. 23) त्यांना निरोप देताना अनेक आजी-माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या शिस्तप्रिय आठवणींना उजाळा देत आनंद आश्रु काढले.

 

माजी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांचा पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या निरोप समारंभासाठी निवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धिवरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त प्रकाश मूत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, महामार्ग पोलीस दलाचे उपायुक्त अशोक पाटील, उपायुक्त सुधीर हिरेमठ , विनायक ढाकणे, स्मिता पाटील, पोलीस अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

“उपलब्ध गोष्टींमध्ये चांगलं प्रशासन त्यांनी निर्माण केलं. उत्तम पोलिसिंगचा पायंडा पाडून दिला. पोलिसिंगच्या बाबतीत अनेक सकारात्मक बदल पद्मनाभन यांच्यामुळे झाले आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर म्हणाले, पद्मनाभन यांच्यासारखे पोलिस आयुक्त मिळणे भाग्य लागते. त्यांच्या अनेक योजना समाजपयोगी यशस्वी ठरल्या. कमर्चारी आणि अधिकाऱ्यांसाठी ते एक ‘देव’च ठरले. कारण आज प्रयत्नच्या इतिहासात कमर्चारी ते अधिकारी थेट आयुक्तांच्या केबिन मध्ये जाऊन बदली मागू शकत होता आणि ते देतही होते.

सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ म्हणाले, “आर के पद्मनाभन म्हणजे प्रॅक्टिकल ऑफिसर. त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. त्यांचं काम पुस्तकरूपाने समाजासमोर यायला हवं.”

निवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धिवरे म्हणाले, “पोलिसांच्या जीवनात आनंदाचे प्रसंग फार कमी असतात. त्यांना त्यांचा आनंद कधीच साजरा करता येत नाही. त्यातून ही निरोपाची प्रथा सुरू झाली आहे. पद्मनाभन यांची कामाची गती आणि शैली खूपच वेगळी आहे. स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. त्यामुळे त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. तसेच धिवरे यांनी आर के पद्मनाभन आणि त्यांच्या एकत्रित पोलीस सेवेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

आर के पद्मनाभन म्हणाले, “आयुक्तालयाच्या कारकीर्दीमध्ये महापालिकेचे सहकार्य चांगले मिळाले. मी कायम संख्यात्मक कामापेक्षा गुणात्मक कामावर भर दिला. त्यात योग्य यश देखील मिळाले आहे. इमारत शोधण्यापासून अडचणी होत्या. पण अडचणींचा बाऊ न करता काम केले. अजूनही आयुक्तालयाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण कमी संसाधनांमध्ये उत्तम काम करण्यातच खरे यश आहे. पोलीस रस्त्यावर दिसायला हवेत, यासाठी पोलीस टीम तयार केल्या. त्यातही यश मिळालं. गरजेच्या ठिकाणी पोलीस काही वेळेत पोहोचू लागले. पोलिसांना त्यांच्या कामाबद्दल समाधान वाटायला हवं, यासाठी चॉईस पोस्टिंगचा उपक्रम राबवला.

जनतेबद्दलची संवेदनशीलता पोलीस खात्यातून कमी होत आहे. पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी भेटत नाहीत, अशाही तक्रारी नागरिकांनी केल्या. इथली जनता, नगरसेवक सर्वजणांनी चांगले सहकार्य केले आहे. सर्वांनी पोलीस आयुक्तालयाला समजून घेतलं. केलेल्या कामाबद्दल समाधान वाटत आहे, असेही पद्मनाभन म्हणाले.

 

Visit : Policenama.com 

You might also like