विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आलेल्या अपीलाचा निकाल ‘जैसे थे’ लावून देण्यासाठी अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विभागीय आयुक्तालयात बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाने 50 हजारांची मागणी केली होती. सचिन लक्ष्मण पंडित (37) असं या वरिष्ठ सहायकाचं नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तक्रारदार हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर गावातील दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्या 2 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं. यानंतर अप्पर विभागीय आयुक्तांच्या समोर सुनावणी सुरू झाली होती. दरम्यान तेथील वरिष्ठ सहायक सचिन पंडित हे तक्रारदारांना भेटले आणि त्यांनी या केसचा निकाल तुमच्या बाजून देऊ असं सांगत 50 हजाराची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नव्हती त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यानंतर आरोपी सचिन पंडित यांनी तडजोड करत तक्रारदाराकडून 40 हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शवली.

यानंतर आज (बुधवार, दि 13 नोव्हेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सापळा रचला. यानंतर आरोपी सचिन पंडित यांनी 40 हजाराची लाच घेताच पोलिसांनी त्यांना रकमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उन्मेश थिटे यांनी केली. यात कर्मचारी संदीप आव्हाळे, संतोष जोशी, मिलिंद ईप्पर, चालक शेख यांचा समावेश होता.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like