राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचं सूचक विधान ! म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते पक्षांतर करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आज त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होऊ शकला नाही. यावर आता खडसेंनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मीडियानं माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते त्यामुळं ते चुकले. योग्य वेळ येईल. वाट पहा असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं. पक्षांतराबाबत त्यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्यानं खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. एवढंच नाही तर खडसेंना कृषीमंत्रीपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितल्यानं ते राष्ट्रवादीत जाणार असे स्पष्ट संकेत मिळत होते.

परंतु खडसेंनी मात्र आज जळगावातच ठाण मांडल्यानं ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळं तो चुकला” असं त्यांनी सांगितलं. यावर योग्य मुहूर्त कोणता ? असा सवाल केल्यानंतर ते म्हणाले, योग्य वेळ येईल. वाट पहा असं सूचक विधान त्यांनी केलं.

‘खडसे-देशमुख’ खलबतं

राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख आज जळगावात आले आहेत. ते एकनाथ खडसे यांच्यासोबत रावेर हत्याकांडामधील कुटुंबीयांची विचारपूस करणार आहेत. त्याआधी हे दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात भेटले. त्यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. मात्र या दोघात काय चर्चा झाली याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. देशमुख यांनी खडसेंची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादीच्या चर्चांनी जोर धरला आहे.