‘ब्लॅक अँड व्हाईट’ जगतातील रेषांचा बादशहा हरपला, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेषा आधि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय सामाजिक परिस्थतीवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी रात्री ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले विकास सबनीस यांनी आपल्या ब्रशच्या एकेका फटकाऱ्याने लाखो लोकांच्या मनातील भावना आपल्या व्यंगचित्रातून व्यक्त केल्या. त्यांचे व्यंगनगरी हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० रोजी झाला. त्यांनी जे जे स्कुल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे व्यंगचित्रकार म्हणून काम केले. बाळासाहेब ठाकरे यांची नजर या तरुण व्यंगचित्रकारावर पडली. त्यांनी मार्मिकसाठी विकास सबनीस यांना आपल्याबरोबर घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते.

बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर सबनीस यांच्याकडे मार्मिकची संपूर्ण जबाबदारी आली. रविवारची जत्रा ही व्यंगचित्रमालिका त्यांनी काही दशके चालविली. कमीतकमी शब्दात आणि थेट वाक्यरचना हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य होते. सबनीस गेली ५० वर्षे व्यंगचित्राद्वार राजकीय व सामाजिक वास्तवावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य करीत असत.

त्यांची काही व्यंगचित्रे परदेशातील नियतकालिकांमध्ये तसेच इंग्रजी साप्ताहिकांमध्येही प्रसिद्ध झाली होती. वयोमानामुळे त्यांनी सध्या काम थांबविले होते. नियमित तपासणीसाठी त्यांना शुक्रवारी कम्फर्ट रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथेच शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/