सांगली : अखेर ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून मिळाला न्याय

भिलवडी ः पोलीसनामा ऑनलाईन

भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांनी पोटगी मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी कडेगांव यांचेकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची खातरजमा करत प्रकाश पाटील यांना पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू गेले पाच महिने पाटील यांना त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळाली नाही.

यानंतर माजी आमदार शरद पाटील यांनी यासंदर्भात सांगली येथे पत्रकार परिषद घेवून भिलवडी पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला होता. जर पोटगी मिळाली नाही तर 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मुलांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B01MR0T89U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09cedf9e-a3c4-11e8-bd0b-33805c44eaa4′]
यासंदर्भात भिलवडी पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रकाश पाटील यांच्या खात्यावर पाच महिन्यांची पस्तीस हजार पोटगी त्यांची मुले तुकाराम पाटील, यशवंत पाटील व प्रशांत पाटील (सर्व रा भिलवडी) यांच्याकडून वर्ग करण्यात आल्याचे म्हंटले आहे. उपविभागीय अधिकारी कडेगांव यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश अगर वॉरंट दिलेला नाही. तरीही भिलवडी पोलिसांकडून प्रकाश पाटील यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल हारुगडे यांनी सांगितले.