ज्येष्ठांना मोठा दिलासा ! मोदी सरकारनं ‘या’ स्कीममध्ये केले बदल, मिळणार FD पेक्षा जास्तीचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना 2019 (SCSS 2019) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांद्वारे गुंतवणूकीची मुदत वाढविली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल जे विशेषत: लॉकडाऊन दरम्यान सेवानिवृत्त झाले आहेत. सरकारने केलेल्या या बदलानंतर आता नुकतेच सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक 30 जून 2020 पर्यंत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतील. दळणवळण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पोस्ट विभागानेही यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर एका महिन्याच्या आत या सेवानिवृत्ती फंडामध्ये गुंतवणूक करावी लागते. तथापि, लॉकडाऊन कालावधी पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. एससीएसएसच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती 60 वर्षे वयाची किंवा खाते उघडण्याच्या तारखेपर्यंत 55 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील असेल तर तो या योजनेस पात्र आहे. यासाठी अट अशी आहे की सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते.

काय आहेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची खास वैशिष्ट्ये ?
1. एससीएसएसमध्ये जास्तीत जास्त ठेव ही एकतर सेवानिवृत्तीवर मिळणारी रक्कम असू शकते अथवा 15 लाख रुपये असू शकते. या दोघांपैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेस एससीएसएसमध्ये गुंतवले जाऊ शकते.

2. जर आपण 60 वर्षांचे आहात आणि आपण नोकरीमधून निवृत्त झाले असाल तर आपण या योजनेत गुंतवणूक करू शकता. एससीएसएस अंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते. एससीएसएस अंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत एखादी व्यक्ती गुंतवणूक करू शकते. एससीएसएसच्या मते संयुक्त किंवा सिंगल खात्यात 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येईल.

3. एससीएसएसमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त नसावी. जर आपण एससीएसएसमध्ये खाते उघडण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करीत असाल तर आपण रोख रक्कम देऊ शकता. जर ही रक्कम 1 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला ती चेक च्या माध्यमाने जमा करावी लागेल.

4. केंद्रीय अर्थ मंत्रालय दर तीन महिन्यांनी एससीएसएसच्या व्याज दराचा आढावा घेते. एससीएसएस मधील व्याजाची गणना प्रत्येक तिमाहीत होते. त्यानुसार 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी आपल्या खात्यात व्याज रक्कम टाकली जाते. सध्या 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

5. एससीएसएसची मुदत 5 वर्षे असते आणि ती तीन वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. आपण वेळेआधीच एससीएसएस खात्यातून पैसे काढल्यास आपल्याला यासाठी काही शुल्क द्यावे लागेल.

6. एससीएसएस 2019 नुसार खाते परिपक्व झाल्यानंतर ते 3 वर्षांसाठी वाढविले जाऊ शकते. एससीएसएसमध्ये तुम्हाला व्याज दर तोच मिळेल जो खाते परिपक्व होण्याच्या वेळी मिळत होता.