कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर (वय 92) यांचं आज मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अकोला जिल्हा परिषदेचे सलग 15 वर्षे अध्यक्ष असलेले बाबासाहेब धाबेकार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सलग 2 वेळा मंत्री होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा हे त्यांचे गाव होते. उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती अशी विविध पदे भूषवल्यानंतर ते कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले.

आमदार झाल्यानंतर बाबासाहेब धाबेकर यांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आणि ते जलसंधारणमंत्री झाले. 1999 मध्ये कारंजातून ते काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये बाबासाहेब ग्रामविकास आणि जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदी झाले. त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली.

धाबा येथील घरी त्यांचे पार्थिव उद्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Visit : Policenama.com