माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसचा ‘हा’ समर्थकच विरोधात लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने निवडणुकीत आव्हान दिले आहे. कराड उत्तर मधील काँग्रेसचे खंदे समर्थक धैर्यशील कदम यांनी उदयनराजे यांचं समर्थन करत शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी कराड उत्तर मधून काँग्रेसकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 58 हजार मतांनी पराभव झाला होता.

उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिळपापड झाला होता. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. काँग्रेसने देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती देत त्यांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले होते.

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढण्यास पृथ्वीराज चव्हाण हे इच्छूक नव्हते. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने अखेर राष्ट्रवादीने माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी दिली.

Visit : policenama.com