महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य ? काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारवर नाराज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून सुरु असलेले हे नाराजीनाट्य थांबण्याचे नाव घेईना झालेय. आता राज्यातील ठाकरे सरकारवर पुन्हा एकादा नराजीचं सावट पसरलं आहे. अलीकडेच काँग्रेसचे मंत्री राज्य सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेतून नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अद्यापही काही मुद्यांवरून नाराजी असल्याचे समोर येत आहे.

वृत्तवाहिन्यांमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नाराज असल्याचे समोर येत आहे. ठाकरे सरकारमध्ये निर्णय घेण्यावरून ही नाराजी असल्याचे समजतय. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी केली. मात्र, तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला डावलं जातंय का असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांना खुद्द चव्हाण यांनाच विचारात घेतले जात नसून प्रस्तावांना मंजूरी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. विभागातील काही अधिकारी परस्पर प्रस्ताव पुढे देत असल्याने अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बांधकाम खात्याला अपेक्षित सचिव न दिल्याने देखील चव्हाण नाराज होते. आता अधिकारीच मंत्र्यांना विचारात घेत नसल्याने आणि प्रस्ताव पुढे ढकलत असल्याने चव्हाण हे चांगलेच संतापले आहेत.
चव्हाणांच्या नाराजीचे कारण काय ?

महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपक्रम विभागास नवीन वेगळा सचिव आणि इतर अधिकारी वर्ग देण्याची मागणी केली आहे. सध्या या दोन्ही विभागांसाठी एकच सचिव कार्यरत असून वेगळा सचिव देण्यास हरकत नाही. मात्र, विभागातील सर्व कर्मचारी वर्ग वेगळे करण्यास अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून आघाडीमध्ये नाराजीनाट्या सुरु असून ते चांगलेच रंगले आहे. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा केली. यानंतर थोरात यांनी पत्रकार परिषदेत आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर महाजॉब्स पोर्टलवरून नाराजीनाट्य सुरु झालं. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही योजना आघाडीची आहे की राष्ट्रवादी-शिवसेनेची आहे असा प्रश्न उपस्थित करत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आघाडी स्थापन करताना तिन्ही पक्षांना समसमान वाटप करण्यात येईल असे सांगितले असताना तसे होत नसल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.