ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय 83) यांचे गुरुवारी (दि. 28) वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्‍चात त्यांचे नेत्र दान करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

शंकर सारडा यांचा जन्म महाबळेश्वर येथे झाला होता. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले असून त्यांनी पत्रकारिता, समीक्षा, बालसाहित्य, लेखन आदी क्षेत्रात मुशाफिरी केली. लहान वयातच त्यांना लिखाणाची आवड होती. बालसन्मित्र बाललेखांचे संपादन, साधना साप्ताहिकाचे सहसंपादक, तसेच विविध दैनिकांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले.

महाबळेश्वर येथे विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, अ. भा. मराठी साहित्य संमेलन (सातारा), पहिले अभिजात साहित्य संमेलन (सातारा), अ. भा.बालकुमार साहित्य संमेलनाचे (सावंतवाडी) अध्यक्ष, वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलनांचे आयोजनात सहभागी आणि महत्त्वाची पदेही त्यांनी भूषविली. चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिपऱ्या आणि रत्नी, गुराख्याचा पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दुःख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती आदी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.