ज्येष्ठ उद्योगपती आणि क्रिकेटपटू माधवराव आपटे यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधवराव आपटे यांचे सोमवारी पहाटे ६ वाजता निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईकडून खेळताना माधवराव आपटे यांनी पर्दापणाच्या रणजी सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यांनी भारताकडून ७ कसोटी सामने खेळले होते. १९५२ -५३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यात त्यांची निवड झाली होती.  वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यांनी पाचही सामन्यात सलामीला येताना ४६० धावा केल्या होत्या. त्यात एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला तोंड देत त्यांनी सलामीला येऊन नाबाद १६३ धावा ठोकून सामना अनिर्णित ठेवण्यात मोठा वाटा उचलला होता. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा त्यांचा हा विक्रम १८ वर्षे अबाधित होता. अशी कामगिरी केल्यानंतरही त्यांना पुन्हा संघात स्थान देण्यात आले नाही.

त्यांनी ७ कसोटी सामन्यात ५४२ धावा केल्या होत्या. त्यात नाबाद १६३ धावांचा समावेश आहे. पहिल्या दर्जाच्या ६७ सामन्यात त्यांनी ३८.७९ च्या सरासरीने ३ हजार ३३६ धावा केल्या होत्या. त्यात ६ शतकांचा समावेश होता.

माधवराव आपटे यांनी मुंबई विद्यापीठातून  कला शाखेतून पदवी घेतली. त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये पर्दापण केले होते. ते क्रिकेट क्लब आफ इंडियाचे अध्यक्ष होते
मुंबईचे शरीफ म्हणून त्यांनी काम केले होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सुनील गावसकर यांच्या हस्ते झाले.

सोलापूरमधील उद्योजकांच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. मुंबई चेंबर आॅफ कॉमर्सचे ते अध्यक्ष होते.
त्यांचे वडिल लक्ष्मणराव आपटे यांनी उभारलेल्या आपटे उद्योग समुहाचा विस्तार केला. असंख्य शैक्षणिक संस्था उभारण्यात त्याचां मोठा वाटा होता. पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.