वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांना अंशत: न्याय ! पोलीस महासंचालक पदाचा सोपविला अतिरिक्त पदभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली अनेक वर्षे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यात डावलल्या गेलेल्या व राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर अंशत: न्याय मिळाला आहे. त्यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

संजय पांडे यांच्याकडे सध्या रस्ते सुरक्षा महामंडळाची जबाबदारी आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. तेव्हा महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. यावेळी संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती.

संजय पांडे हे १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून सध्या राज्यातील ते सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. असे असतानाही त्यांना सातत्याने महत्वाच्या पदावरील बदल्यात डावलले गेले आहे. त्यामुळे ते अनेक वर्षे केंद्रीय सेवेत गेले होते. मुंबई पोलीस आयुक्त पदावर परमबीर सिंह यांची निवड करतानाही त्यांना डावलले गेले होते. तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदासाठीही त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त करुन सुट्टीवर गेले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही नाराजी अंशत: दूर केली. संपूर्णपणे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती न करताना त्यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.