ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र, म्हणाले – ‘देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, लस याचा तुटवडा जाणवत आहे. लसींच्या तुटवड्यावरून विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. अशातच ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर कोरोना लसीकरणासंदर्भात एक पोस्ट लिहून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले आहे की, दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस पाठवण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस परदेशात पाठवण्यात आले. जेणेकरून तेथून येणारे नागरिक भारतात आल्यावर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याचाच अर्थ केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक चिंता होती. त्यासाठीच 1 कोटी कोरोना लसी पाठवल्या होत्या. यावर हसाव की रडावं हेच समजत नाही. आता सत्य बाहेर पडू लागले, तेव्हा सर्व लसी निर्यात केलेल्या नाहीत, अशी सारवासरव केंद्र सरकार करत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी देखील रवीश कुमार यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात 34 लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, अशातच उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही आणि बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नकोय, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे अतिशय खेदजनक आहे, अशी खंत रवीशकुमार यांनी सोशल मडियावर व्यक्त केली होती.