वरिष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचा कोरोनाने मृत्यू; PM मोदींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हजारो लोक बाधित होत आहेत तर शेकडो जणांचा मृत्यू होत आहे. त्यातच आता वरिष्ठ हिंदी पत्रकार शेष नारायण सिंह यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज (शुक्रवार) निधन झाले. त्यांच्यावर ग्रेटर नोएडा येथील GIMS रुग्णालयात उपचार सुरु होते.

शेष नारायण सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीही केली होती. मात्र, तरीही त्याचा काहीही फरक पडला नाही. त्यानंतर आता त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर माध्यम क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांना अनेक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय नेतेमंडळींनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करत म्हटले, की ‘वरिष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचे निधन झाल्याने अत्यंत दु:ख झाले. पत्रकारिता विश्वात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. ते कायम स्मरणात राहतील. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो’.

दरम्यान, यापूर्वी प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता पत्रकार शेष नारायण सिंह यांचे निधन झाले आहे.