ज्येष्ठ विधिज्ञ, माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ वकिल, माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी (वय ९५) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. इंदिरा गांधी यांच्या मारेकाऱ्यांचे वकिल पत्र घेतल्याने त्यांना मोठी टिका सहन करावी लागली होती.

देशातील सर्वाधिक महागडे वकिल म्हणून ख्याती असलेले राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात झाला. ते भाजपाच्या तिकीटावर मुंबईतून दोनदा निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात केंद्रीय विधी व न्याय आणि शहर विकास मंत्री म्हणून काम केले होते. नेहमीच विवादास्पद राहिलेल्या राम जेठमलानी यांना भाजपाने पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी वाजपेयी यांच्या विरोधात २००४ मध्ये लखनौमधून निवडणुक लढविली होती. २०१० मध्ये ते सुप्रीम कोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. २०१० मध्येच त्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना राजस्थानमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आणण्यात आले होते.

शालेय शिक्षणापासूनच ते खूप हुशार असल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन इयत्ता एका वर्षात पास करीत अवघ्या १३ व्या वर्षी ते मॅट्रीक पास झाले. १७ व्या वर्षी  त्यांनी एल एल बी पदवी मिळविली. वकिलाची प्रॅक्टिस करण्यासाठी तेव्हा २१ वर्ष पूर्ण असण्याची अट होती. राम जेठमलानी यांच्यासाठी विशेष प्रस्ताव पार करुन १८ व्या वर्षी त्यांना प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांना चार मुले आहेत. त्यांच्यातील महेश जेठमलानी हे प्रख्यात वकील आहेत.

हाय प्रोफाईल केसेसमध्ये ते वकिली करीत असल्याने नेहमीच विवादास्पद राहिले आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले. उच्च न्यायालयातील सर्वात महागडे वकिल म्हणून त्यांची ख्याती पसरली होती. ते एका केसचे तेव्हा २५ लाख रुपये फी घेत असल्याची चर्चा होती. असे असले तरी अनेक खटल्यात त्यांनी कोणतीही फि न घेता केस लढविली होती. राजीव गांधी यांचा १९८९ मध्ये पराभव झाल्यानंतर व्ही पी सिंह यांच्या सरकार स्थापनेच्या वेळी राम जेठमलानी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.

त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकिलपत्र घेतले होते. १६ वर्षाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढविला होता. लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली होती. सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले. रोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बाजू मांडली होती. सर्वच पक्षातील हाय प्रोफाईल नेत्यांच्या केसेस त्यांनी लढविल्या होत्या.