शिवसेना ‘गावोगावी-घरोघरी’ पोहचवण्यासाठी पक्षाची ‘तयारी’, ज्येष्ठ नेते उचलणार ‘शिवधनुष्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेना देखील राज्यातील आपली ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून आपले ज्येष्ठ नेते मैदानात उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून पक्ष बांधणीवर जोर दिला जात आहे.

लोकसभेत शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. ज्यात शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांच्या समावेश आहे. विधानसभा झाल्यानंतर तीन पक्षांचे सरकार असल्याने शिवसेनेला आपल्या दिग्गज नेत्यांना संधी देता आली नाही. ज्यात दिवाकर रावते, दिपक केसरकर, सुनील राऊत यांचा समावेश आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंना आता शिवसेनेची कमान संभाळत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संभाळायची आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर देखील कॅबिनेटमंत्री पदाची धूरा सोपावण्यात आली आहे. त्यामुळे दोघेही पक्ष संघटनेत पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नाहीत. यावर पर्याय म्हणून पक्ष संघटनेची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांच्या खांदावर देण्याची योजना शिवसेनेने आखली आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलेले पक्षातील ज्येष्ठ नेते यासाठी काम करतील अशी शक्यता आहे. तेच शिवसेनेला घरोघरी – गावागावात पोहचवण्याचे काम करतील. त्यामुळे काही कारणाने मध्यवधी निवडणूका घेण्याची परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी शिवसेना सज्ज राहू शकेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/