छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गुरुवारी नागपुरात छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या केली. राजेश श्रीवास्तव असे अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी खोलीचे दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सेलफोस नावाचे विषारी औषधाचे पाकीट मिळाले आहे. तेच प्राशन करून राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बदलीमुळे ते तणावात होते अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक म्हणून काम पाहत होते. १ मार्चला ते रायपूरमधील कोषागार संचालनालयातील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे साडेअकरा वाजता पत्नीने त्यांना सोडले होते. मात्र, राजेश श्रीवास्तव तिथे जास्त वेळ थांबले नाही आणि अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून चाळीस मिनिटांना ते कोषागार सांचालनालयातून बाहेर पडले. कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत. रायपूरच्या कोषागार संचालनालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

राजेश श्रीवास्तव यांनी २ मार्चला नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुय्यम दर्जाच्या पूजा लॉजमध्ये खोली घेतली. दोन मार्चला त्यांचे वर्तन सामान्य होते. तीन मार्चला सकाळी दहा वाजता ते लॉजच्या बाहेर ही गेले होते. थोड्याच वेळात परतले आणि नंतर सायंकालपर्यंत दार उघडले नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना त्यांनी ही माहिती कळवली.