बीड : वरिष्ठ अधिकार्‍यानं चक्क ‘पंचिंग’ मशीन मारून फोडलं कर्मचार्‍याच ‘डोकं’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या बाचाबाचितून वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला पंचिंग मशीन फेकून मारल्याने कर्चमाऱ्याचे डोके फुटले. हा प्रकार जिल्हा उम्मेद अभियान कार्यालयात दोन दिवसांपूर्वी घडला. याप्रकरणी आज (बुधवार) वरिष्ठ अधिकाऱ्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुरहरी सावंत असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून बलबीर शंकर मुंडे असे मुजोर जिल्हा उम्मेद अभियान व्यवस्थाकाचे नाव आहे. मुंडे याच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून बलबीर मुंडे याला तात्काळ निलंबीत करण्याची मागणी पीडित कर्मचाऱ्याने केली आहे.

ऑफिसमधील कामकाजावरून बलबीर मुंडे आणि मुरहरी सावंत यांच्या हमरी तुमरी झाली होती. या वादामध्ये मुंडे यांनी सावंत यांना पंचिंग मशीन फेकून मारले. यात सावंत यांचे डोके फुटले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंडे याने शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुरहरी सांवत यांनी केला आहे. मुंडे हे अधीपासून मानसिक त्रास व खालच्या भाषेत बोलणे, अडचणीत आणण्याची धमकी देणे असेही आरोप त्यांनी केले आहेत. यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी सावंत यांनी यांनी केली आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला पंचिंग मशीन फेकून मारल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.